मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त करत आपला राजीनामा दिल्यानंतर आज अखेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. देशभरातील १३ राज्यांमध्ये आज फेरबदल झाले. दरम्यान, आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस धुरा सांभाळणार आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक उद्गार काढले होते. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढले होते. त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली होती. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता. महाविकास आघाडीने तर राज्यपालांच्या विरोधात मोठा मोर्चाही काढला होता. तसेच राज्यात ठिकठिकाणी राज्यपालांचे पुतळे जाळून आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी विरोधकांनी राज्यपालांच्या हकालपट्टीची जोरदार मागणी केली होती.
परिणामी सत्ताधारी भाजपची चांगलीच राजकीय कोंडी झाली होती. तसंच स्वत: कोश्यारी हेदेखील आपल्याला पदमुक्त करण्यात यावं, अशा भावना व्यक्त करत होते. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रपतींकडून त्रिपुरा आणि झारखंडसारख्या राज्यांच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळलेल्या अनुभवी रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

