मुंबई : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून आता काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. कारण काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे हे निवडणुकीत विजयी झाले. पण आता बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
बाळासाहेब थोरात यांनी दिलेला राजीनामा म्हणजे कॉंग्रेस पक्षासाठी मोठा धक्का आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर काँग्रेसने तांबे पिता पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. यावरून काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद सुरू झाले आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही यासंदर्भात बोलताना नाराजी व्यक्त केली होती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांनी पत्र दिले होते.
थोरातांनी लिहले होते पत्र…
“विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठं राजकारण झालं. सत्यजीत या निवडणुकीत चांगल्या मतांनी विजयी झाले. मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र, जे राजकारण झालं, ते व्यस्थित करणारं होतं. मी याबाबत माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे,” अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरातांनी दिली होती. त्यानंतर आता थेट राजीनामा दिल्याने कॉंग्रेमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

