मुंबई – मुंबई महापालिकेची भ्रष्टाचारावर आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. पालिकेने विविध खात्यात झालेल्या भ्रष्टाचारामध्ये चौकशीअंती दोषी ठरलेल्या ५५ कर्मचाऱ्यांना सेवेतून तडकाफडकी बडतर्फ केले आहे. तसेच, १३४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. त्याचप्रमाणे, महापालिकेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. जे कोणी भ्रष्टाचार करीत असतील व ते चौकशीत दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास पालिका प्रशासन कचरत नसल्याचे कृतीतून दाखवून दिले आहे, अशी शेखी पालिका प्रशासन मिरवीत आहे.
मुंबई महापालिकेत गेल्या काही वर्षात रस्ते, शैक्षणिक साहित्य खरेदी, कीटकनाशक खरेदी, मूषक संहार, भंगार विक्री, टीडीआर, भूसंपादन, शालेय पोषण आहार, टॅब खरेदी, अनधिकृत बांधकामे आदी बाबतीत भ्रष्टाचार, घोटाळा झाल्याचे आरोप विरोधी व सत्ताधारी पक्षाने केले आहेत. अनेक प्रकरणे उघडकीस आली. अनेक प्रकरणात चौकशीत काहीजण निर्दोष सुटले तर अनेकजण दोषी आढळून आले. गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. या कोरोना नियंत्रणासाठी पालिकेने आतापर्यत ५ हजार कोटींचा खर्च केला असून त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप, काँग्रेसकडून वेळोवेळी करण्यात आले. त्याप्रकरणी पालिकेने बोगस कागदपत्रांच्या मुद्द्यावर बोट ठेवत पोलिसांकडे तपासकार्य दिल्याचे सांगत आपले हात वर केले आहेत.
सध्या या कोरोना काळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची चर्चा मुंबईसह महाराष्ट्रात सुरू आहे. अशा परिस्थितीत मुंबई महापालिकेने पालिकेच्या विविध खात्यात गेल्या काही कालावधीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी कर्मचारी यांच्या विरोधात काय कारवाई केली, याबाबतची माहिती उघड करून आपली ‘कॉलर’ टाईट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

