जळगावः पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. रस्त्यावर धावण्याचा सराव करताना अज्ञात वाहनाचा धडकेत मृत्यू झाला आहे.रोहित अशोक मराठे (वय १८) असे मयत तरुणाचे नाव असून ही घटना भडगाव तालुक्यातील कजगाव येथे घडलीय.
याबाबत असे की, कजगाव येथे रोहित अशोक मराठे हा कुटुंबियांसोबत वास्तव्यास आहे. रोहित याचे पोलीस होण्याचे स्वप्न असून पोलीस भरतीसाठी तो सराव करत होता. सोमवारी सकाळी रोहित हा नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसोबत भडगाव रस्त्यावर धावण्याचा सराव करण्यासाठी गेला होता. यादरम्यान चाळीसगावकडून भडगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रोहितला मागून जोरदार धडक दिली.
वाहनाच्या जोरदार धडकेत रोहित मराठे याच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यावेळी रोहित सोबत असलेल्या वैभव बोरसे, हर्षल पाटील, दत्तू महाजन या मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच दादाभाऊ पाटील, रवी मालचे, अशोक पाटील हे सुध्दा मदतीला धावले होते. जखमी रोहितला पुढील उपचारासाठी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र रस्त्यातच रोहितची प्राणज्योत मालवली होती. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.
हे सुद्धा वाचाच..
अर्थसंकल्पानंतर 35 वस्तूंच्या किमती वाढणार? जाणून घ्या काय स्वस्त, काय महाग होणार
खुशखबर..! राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना तात्काळ मिळणार पैसे
ही तर लोकशाहीची थट्टा ! सरपंच, उपसरपंच पदासाठी लाखोंची बोली, औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार
रोहित हा भडगाव येथील न्यू इंग्लिश माध्यमिक शाळेत बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. त्याचे कुटुंबिय शेती करुन आपला उदरनिर्वाह करतात. मयत रोहीत मराठे यांच्या पश्चात वडील, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. रोहितचे पोलीस होण्याचे स्वप्न होते. पोलीस होऊन कुटुंबांची परिस्थिती सुधारावी अशी त्याची इच्छा होती. यासाठी तो आपल्या मित्रांसोबत सकाळी, सायंकाळी भरतीसाठी तसेच नित्याने व्यायामाचा सराव सुरू होता. मात्र अपघाताच्या रुपाने त्याच्यावर काळाने झडप घातली होती व पोलिस होण्याचे त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

