मुंबई – मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे यांची तर कार्यवाहपदी प्रवीण पुरो यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्यपदी जळगाव येथील दैनिक लोकशाही चे कार्यकारी संपादक कमलाकर वाणी यांची निवड झाली. खानदेशातुन पहिल्यांदा मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीत वाणी यांची निवड झाली आहे.
कार्यकारिणी सदस्य पदासाठी निवडून द्यवयाच्या पाच जागांमधुन वाणी यांनी ६१ मते मिळवून तिसऱ्या नंबरवर विजयी झालेत. खान्देशातील पत्रकार मुंबईत मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाच्या चुरशीच्या निवडणुकीत विजयी झाल्यामुळे वाणी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अध्यक्षपदासाठी प्रमोद डोईफोडे यांना सर्वाधिक 78 मते मिळून ते विजयी झाले. राजा आदाटे यांना 49 तर दिलीप जाधव यांना 28 मते मिळाली.
मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाची द्वैवार्षिक निवडणूक प्रक्रिया आज सोमवारी ३० जानेवारी रोजी पार पडली. दिवसभर मतदान झाल्यानंतर सायंकाळी मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजन पारकर यांनी काम पाहिले.
सर्व कार्यकारिणी आणि संघाच्या सदस्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे नवनिर्वाचित सदस्य प्रमोद डोईफोडे यांनी ‘लोकशाही’ला सांगितले. मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाची प्रतिष्ठा जपण्यावर; तसेच सर्व सदस्यांच्या हिताच्या योजना राबविण्यावर आपला भर राहील, असेही त्यांनी सांगितले.
कार्यवाह पदासाठी प्रवीण पुरो यांना 85 तर मिलिंद लिमये यांना 71 मते मिळाली.
उपाध्यक्षपदी 58 मते घेऊन महेश पवार हे विजयी झाले. पांडुरंग मस्के यांना 41, राजेंद्र थोरात यांना 30 तर नेहा पुरव यांना 29 मते मिळाली. कोषाध्यक्षपदी 67 मतांसह विनोद यादव हे विजयी झाले. प्रवीण राऊत यांना 50, तर किशोर आपटे यांना 36 मते मिळाली कार्यकारिणी सदस्यपदी सर्वाधिक 71 मतांनी आलोक देशपांडे यांच्यासह मनोज मोघे (68), कमलाकर वाणी (61), खंडुराज गायकवाड (59) आणि भगवान परब (58) यांची वर्णी लागली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी वार्ताहर कक्षात जाऊन संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांचेसह सर्वच विजयी पत्रकारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी संघाचे वर्तमान अध्यक्ष मंदार परब हेही उपस्थित होते.

