मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण आलं असून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांनी युतीची घोषणा केली आहे. मुंबईतील आंबेडकर भवन येथील संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि वंचितची आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा अध्याय ठरणार आहे.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आंबेडकर आणि ठाकरे या नावाला इतिहास आहे. सध्याच्या राजकारणात वाईट प्रथा सुरु आहेत. त्यामुळे पुढील वाटचालीसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. देशातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आणि घटनेचं पावित्र्य जपण्यासाठी आम्ही दोघे एकत्र येत आहोत असं उद्धव ठाकरेंनी म्हंटल. तसेच वंचित सोबतच्या युतीबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सुद्धा चर्चा केली आहे असेही त्यांनी सांगितलं.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनीसुद्धा या नव्या युतीबाबत भाष्य केले. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याची गरज होती त्यामुळे लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असं त्यांनी म्हंटल. देशात बदला घेण्याचे राजकारण सुरु आहे. देशात आणि राज्यात भांडवलदार आणि लुटारूंचे सरकार आहे असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली.

