पुणे : उत्तरेतून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका पाहायला मिळाला. मात्र अशातच आता हवामान खात्याने राज्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान मराठवाडा, विदर्भ व परीसरात हलका -मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 25 तारखेपासून ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिक, जळगाव, विदर्भातील काही जिल्ह्यात पुढचे दोन दिवस थंडी राहण्याची शक्यता आहे.
पुढील आठवड्यापासून उत्तर भारतातील बहुतांश भागात पाऊस आणि डोंगराळ भागात बर्फवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानंतर 23 जानेवारीपासून उत्तर भारतात पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
दरम्यान पुढच्या काही दिवसांत ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. तर पठारी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. हवामान विभाग दिलेल्या माहितीनुसार, 24 जानेवारीच्या संध्याकाळपासून पावसाची शक्यता आहे. 24 ते 26 जानेवारीच्या सकाळपर्यंत हलका पाऊस पडू शकतो. तसेच पुढच्या पाच दिवसांत हवामानात कोणताही महत्त्वपूर्ण बदल होणार नसल्याची माहिती आहे.