नाशिक : ठाकरे गटातून शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. ठाकरे गटामधील गळती काही थांबताना दिसत नाही आहे. आता नाशिकमध्ये शिंदे गटाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. आज नाशिकचे जवळपास 50 पदाधिकारी कार्यकर्ते हे शिंदे गटात प्रवेश करणार आहे.
विशेष म्हणजे आज खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी संजय राऊत २ दिवस नाशिक दौऱ्यावर आहे. मात्र आजच नाशिकमधील ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
हा ठाकरे गटासाठी दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी देखील नाशिकमधील ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आज देखील अनेक कार्यकर्ते हे ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला नाशिकमध्ये धक्क्यावर धक्के बसत असल्याचं दिसून येत आहे.
नरेश मस्के यांचं ट्विट
दरम्यान याबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी देखील एक सूचक ट्विट केलं आहे. ‘आज पुन्हा एकदा उडणार आहे भडका सपक झालेल्या डाळीला दिलाय आम्ही तडका सकाळच्या भोंग्याला पुन्हा एक चपराक बसेल खरे मावळे कुठे आहेत सगळ्या जगाला दिसेल बाळासाहेबांच्या नावावर राष्ट्रवादीचे दुकान चालवले म्हणून खरे शिवसैनिक एकेक करून सोडून चालले ‘ असं ट्विट नरेश मस्के यांनी केलं आहे.