सिरोही : कोण कधी कुणावर प्रेम करेल हे सांगता येत नाही. काहीजण प्रेमात अक्षरश: वेडे होतात आणि घरदार सोडून पळून जातात. अशातच राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात सासू आणि जावईच्या अनोखी प्रेमकहाणी समोर आली आहे. येथे सुमारे 40 वर्षांची सासू तिच्या 27 वर्षांच्या जावईच्या प्रेमात पडली. प्रेम फुलल्यावर सासू आणि जावई दोघेही घरातून पळून गेले. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सासऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी जावयावर गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात ही घटना घडली आहे. येथील एका २७ वर्षीय तरुणाचे महिनाभरापूर्वी लग्न झाले होते. आपल्या लाडक्या जावयाला जेवणाचं निमंत्रण द्यावं असं सासू-सासऱ्यांनी ठरवलं. ठरल्यानुसार, जावई घरी आला. त्याने सासऱ्यासोबत दारूची पार्टी केली. रात्री सगळ्यांनी मटणावर ताव मारला आणि झोपी गेले. दरम्यान, आपल्यावर कुणाचं लक्ष नसल्याचं बघत जावई हा सासूला घेऊन फरार झाला.
जेव्हा सासरा शुद्धीवर आला तेव्हा त्याला घरात जावई दिसला नाही, त्याने शोध घेतला असता, बायको सुद्धा घरात दिसून आली नाही. आपली लाडकी बायको लाडक्या जावयासोबत फरार झाल्यानंतर सासऱ्याला धक्काच बसला त्याने तातडीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.
सासूचा जडला होता जावयावर जीव
मिळालेल्या माहितीनुसार, ४३ वर्षीय सासूचे लग्नाच्या आधीच २७ वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबध होते. दोघांचाही एकमेकांवर जीव जडला होता. आपले नाते कायम टिकावे यासाठी सासूने एक प्लॅन आखला. तिने आपल्या मुलीचे लग्न या तरुणसोबत लावून दिले. लग्नाच्या महिनाभरानंतर दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला. हा प्रकार सासरच्या मंडळींना समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली. आता पोलिस दोघांचा शोध घेत आहेत.