नागपूर : नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजास सुरुवात झाल्यानंतर आज पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कामकाजात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सीमावादाच्या प्रश्नावरून हल्लाबोल केला.
एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नाही, अशी भूमिका कर्नाटक सरकारने मांडली. तशी धमक आपल्यात आहे का? आपण तशी भूमिका मांडू शकतो का? असा सवाल करतानाच सीमावादाचा प्रश्न सोडवला गेला नाही. कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रात एका पक्षाचं सरकार आहे. दोन्ही मुख्यमंत्री पंतप्रधानांना आपला नेता मानतात. आपले मुख्यमंत्री दिल्लीत जातात. ते या विषयावर बोलणार आहेत का? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
कर्नाटक व महाराष्ट्र सीमाप्रश्नात केंद्र सरकार पालक म्हणून वागतंय का? महत्वाचे प्रश्न सोडून मुख्यमंत्री दिल्लीत गेलेत. तिथे ते ह्यावर बोलतील का?
– शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे (हिवाळी अधिवेशन, नागपूर) pic.twitter.com/EEjWwLrj7z— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) December 26, 2022
सीमावादाची परिस्थिती कोणी बिघडवली? हा प्रश्न कोर्टात गेल्यानंतर एक एक पाऊल कोणी पुढे टाकलं? महाराष्ट्राने केलं आहे का? कर्नाटकाने डिवचण्याचं काम केलं. त्यामुळे परिस्थिती बदलली, असंही त्यांनी सांगितलं.
कर्नाटकातील सीमाभागात मराठी भाषा ही मातृभाषा म्हणून मुरलेली आहे. तिथल्या कित्येक पिढ्या मराठीत शिक्षण घेत आहेत. त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरू आहेत. हा दोन भाषांचा लढा नाही. आपण सरकारबाबत बोलू शकतो. पण हा माणूसकीचा लढा आहे. मराठी भाषिकांनी कर्नाटकात राहून केवळ मराठीत बोलूनच आपला मनोदय व्यक्त केला. महाराष्ट्रात जायचं सांगितलं आहे. ठराव मांडले आहेत. निदर्शन केली आहेत. लोकशाही मार्गाने जे जे करायचं ते केलं आहे. पण हा प्रश्न मार्गी लागला नाही, असंही त्यांनी सांगितलं.