जळगाव : जळगाव जिल्ह्यातील १४० ग्रामपंचायतींसाठी उद्या १८ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या सर्व ग्रामपंचायतींपैकी एका ग्रामपंचायतीची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. ती म्हणजे ज्यांनी गुजरात जिंकण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला त्या गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांच्या कन्या आता जळगावातील निवडणुकीत उतरल्या आहेत.
जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायतीत सी.आर. पाटील यांची कन्या भाविनी पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांनी मोहाडी गावात आपले ग्रामविकास पॅनल उभे केले आहे. त्यामुळे गुजरात जिंकणाऱ्या वडिलांची परंपरा कायम राखत मुलगी आता मोहाडीच्या निवडणुकीचं मैदान मारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मोहाडी ग्रामपंचायतीच्या १० जागांसाठी निवडणूक उद्या पार पडत आहे. त्यात एक जागा लोकनियुक्त सरपंचपदाची आहे. सरपंचपद हे यावेळी एसटी कॅटेगिरीसाठी राखीव आहे. भाविनी पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित ग्रामविकास पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात आहे. ग्रामविकास पॅनल समोर लोकशाही उन्नती पॅनलचं आव्हान आहे. भाविनी पाटील या मागच्या काळात पाच वर्षे लोकनियुक्त सरपंच होत्या. विकास कामांच्या बळावर आपण यावेळी आपलं पॅनल निवडून आणू असा त्यांना आत्मविश्वास आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये मूळचे जळगावचे असणाऱ्या सीआर पाटील यांनी महत्त्वाची कामगिरी बजावत भाजपला विक्रमी विजय मिळवून दिला. आता त्यांच्या कन्या असलेल्या भाविनी पाटील मोहाडीच्या निवडणुकीचं मैदान मारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.