जळगाव (प्रतिनिधी)- सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नाशिक विभागाचे मुख्य अभियंता आवटी यांच्याकडे जळगाव विभागातून मंजुरीसाठी गेलेल्या कामांच्या प्रस्तावांना मंजुरीसाठी मुख्य अभियंता नाशिक यांच्याकडे कागदपत्रे पाठविली जातात. या कामांच्या प्रस्तावाला वेळीच मंजुरी न देता विकास अकारण खीळ घालत फाईल्स थांबविण्याचा अजब प्रकार मुख्य अभियंता (नाशिक) यांच्याकडुन होत असल्याने आ. राजुमामा भोळे व पाचोऱ्याचे आ.किशोर पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार श्री.आवटी यांच्याकडे आहे. आवटी यांच्याकडे नियमित पदभार मुंबई विभागाचा आहे. त्यामुळे त्यांना नाशिक विभागाच्या कामांना न्याय देता येत नाही. नाशिक विभागात नाशिक , नगर, जळगाव, धुळे, नंदूरबार या पाच जिल्ह्यातील विकास कामांच्या प्रस्ताव मंजुरीच्या कामाचा त्यांच्या अखत्यारीत समावेश आहे.
दरम्यान, ‘नजरकैद ’ प्रतिनिधीने आ. राजुमामा भोळे यांच्याशी संपर्क साधला असता आ. चंदुभाई पटेल व माझ्या कामांच्या प्रस्तावांना वेळीच मंजुरी न दिल्यामुळे कामे रखडली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाभरातील विकासकामांचे अनेक प्रस्ताव मुख्य अभियंता (नाशिक) यांच्याकडे नेहमी जातात. मुख्य अभियंता (नाशिक) यांच्याकडे प्रभारी पदभार असल्याने कामे वेळीच करण्यासाठी ते अकार्यक्षम असल्याचेही या आमदारांनी सांगितले. मुख्य अभियंता (नाशिक) यांना जिल्ह्यातील ना. गिरीश महाजन व ना. गुलाबराव पाटील या वजनदार मंत्र्यांनी वेळीच सूचना देवून विकासकामांच्या प्रस्तावांना तात्काळ मंजुरी देणेसंबंधी सूचना कराव्यात, जेणेकरुन विकासकामांना मंजुरी मिळून विकासकामे तात्काळ मार्गी लागतील, अशी मागणी आमदारांसह जनतेकडून होत आहे.
मुख्य अभियंता (नाशिक) यांच्याकडे नाशिक विभागाचा अतिरीक्त पदभार आहे. त्यांच्याकडून कामे वेळेत होत नसल्यामुळे लोकप्रतिनिधींचीही तीव्र नाराजी त्यांच्यावर आहे. अशी परिस्थिती असतांनाही काही विशिष्ट कामांच्या मागील पाच वर्षाआधी झालेल्या काही विशिष्ट कामांची पाहणी करुन दक्षता व पुर्ननियंत्रण समिती (नाशिक) यांना पत्रव्यवहार करुन स्थानिक अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्याचा त्यांचा फंडा नेमका कशासाठी आहे ?, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
ना. गिरीश महाजन व ना. गुलाबराव पाटील यांनी वेळीच या गंभीर विषयाची दखल घेत मुख्य अभियंता (नाशिक) यांना जाब विचारला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मागील कामांच्या तपासणीच्या मुख्य अभियंता (नाशिक) यांच्या पत्रव्यवहाराने स्थानिक अधिकाऱ्यांचा कामातील महत्त्वाचा वेळ अकारण कागदपत्रे गोळा करण्यात जात असल्याने विकास कामांच्या इतर बाबींना खीळ बसत आहे.