मुंबई : आजकाल फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लोकांना फसविण्यासाठी गुन्हेगार नवनवीन युक्त्या शोधून काढत आहेत. गेल्या काही काळात एटीएमवर सुध्दा फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. एटीएम कार्डच्या साहाय्याने पैसे काढताना थोड्या निष्काळजीपणामुळे हॅकर्स तुमची लाखो रुपयांनी फसवणूक करू शकतात. अशात, जर तुम्हालाही एटीएम फ्रॉड टाळायचे असेल तर काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. एक छोटीशी चूक तुमचे मोठे नुकसान करू शकते. आम्ही तुम्हाला या ठिकाणी अशा महत्त्वाच्या टिप्स सांगत आहोत यातून तुम्ही सुरक्षितरित्या पैसे काढू शकता.
एटीएम पिन बदलण्याचा अर्थ असा नाही की, तो रोज बदलला पाहिजे. यामुळे तुम्हाला पिन लक्षात ठेवण्यात खूप अडचणी येतील आणि 3 वेळा चुकीचा पिन टाकल्यास कार्ड ब्लॉक होईल. तुमचा एटीएम पिन दर 2 ते 3 महिन्यांनी बदला. एटीएम वापरताना अनेक ग्राहकांना समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक एटीएममध्ये कार्ड पेमेंट प्रोसेस होईपर्यंत येत नाही. अशा परिस्थितीत ते एटीएमजवळ उभ्या असलेल्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीची मदत घेतात. अज्ञात व्यक्ती तुमची फसवणूक करू शकते. जर तुम्हाला एटीएम मशीन कसे वापरायचे हे माहित नसेल, तर तुमच्या ओळखीच्या आणि विश्वासू व्यक्तीला घेऊन जा.
पिन टाकताना खबरदारी घ्या
अनेक वेळा एकाच ठिकाणी दोन किंवा अधिक एटीएम बसवले जातात. अशा वेळी तुमच्या शेजारी उभी असलेली अज्ञात व्यक्ती फसवणूक करणारा ठरू शकतो. यामुळे तुम्हाला अधिक सावध राहण्याची गरज आहे. एटीएमवर पिन टाकताना तुम्ही दुसऱ्या हाताने तो लपवण्यासारखी युक्ती वापरू शकता. यामुळे तुमच्या मागे किंवा शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीला तुमच्या एटीएम कार्डचा पिन कळणार नाही. एटीएम वापरताना आजूबाजूला नक्की पाहा. जर तुम्हाला काही संशयास्पद वाटले तर दुसऱ्या एटीएममध्ये जाणे चांगले.
एटीएम पिन आणि कार्ड कोणालाही देऊ नका
घाईघाईत पैसे काढण्यासाठी अनेक जण मित्रांना किंवा नातेवाईकांना एटीएम कार्ड आणि पिन देतात. असे करणे अल्पावधीत सोयीचे असू शकते, परंतु दीर्घकाळात तुमची फसवणूक होऊ शकते. अशी चूक करू नका. जवळच्या लोकांनीच लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना गेल्या काही काळात समोर आल्या आहे. काही कारणास्तव तुम्हाला एटीएम पिन आणि कार्ड कुणाला द्यायचे असल्यास ताबडतोब कार्डचा पिन बदला आणि बँक स्टेटमेंट पहा.