गुजरातमधील विधानसभेच्या 89 जागांसाठी आज (1 डिसेंबर) पहिल्या टप्प्यात मतदान झाले. यावेळी आम आदमी पक्षाने (आप) 181 विधानसभा जागांवर आपले उमेदवार उभे करून ही लढत रंजक बनवली आहे. या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आधीच राज्यभरामध्ये निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत रोख रक्कम, दारू, मोफत भेटवस्तू असा एकूण 290 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर एवढा मोठा मुद्देमाल सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान आज झाले. या पार्श्वभूमीवर, पोलीस तसेच इतर यंत्रणांच्या मदतीने राज्यभरात केलेल्या कारवाईत निवडणूक आयोगाच्या पथकाने 290 कोटींची मुद्देमाल जप्त केला. यामध्ये नशा करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ प्रामुख्याने मेफेड्रोनची तस्करी केली जात असल्याची दोन प्रकरण उघडकीस आली आहेत. या छापेमारीमध्ये 478 कोटी किंमतीचं 143 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आलं असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
राज्यात बंदी असूनही दारूचा पूर
गुजरात एटीएसच्या या मोहिमेदरम्यान प्रतिबंध असलेल्या औषधांबरोबरच 61 कोटी 96 लाखांचे अंमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. 14 कोटी 88 लाख किंमत असलेली चार लाख लिटर दारुही जप्त केल्याचं आयोगाने म्हटलं आहे. दारुबंदी असलेल्या राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात दारुचा साठा आढळल्याने चर्चांना उधान आले आहे. 2017 च्या निवडणुकीदरम्यान एकूण जप्त करण्यात आलेली रक्कम ही 27 कोटी 21 लाख इतकी होती. यंदा 29 नोव्हेंबरपर्यंत जप्त करण्यात आलेली रक्कम ही 290 कोटी 24 लाख इतकी आहे. ही मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 10.66 टक्के अधिक असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.
भाजपा उमेदवाराविरुद्ध एफआयआर
निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच भाजपाच्या एका उमेदवाराने मद्याची खुलेआम विक्री करता येऊ शकते, असे कथित वक्तव्य केले. त्यामुळे या उमेदवाराविरोधात ‘एफआरआय’ दाखल करण्यात आला आहे. गुजरातमध्ये मादक पदार्थ तयार करणे, बाळगणे, विक्री आणि वापरास बंदी आहे. 26 नोव्हेंबर रोजी एका सभेची चित्रफित प्रसारीत झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी बनारसकांठा जिल्ह्यातील दांता मतदारसंघातील भाजप उमेदवार लाटूभाई पारघी यांच्याविरोधात तक्रार दाखल आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. मद्य खुलेआम विक्री करण्यास परवानगी देण्यात येईल, असे पारघी यांनी महिलांच्या एका गटासमोर कथित वक्तव्य केल्याचा आरोप आहे.