मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतुत्वखाली झालेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. शिंदे गटाने भाजपसोबत युक्ती करून सरकार स्थापन केलं आहे. दरम्यान,काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडसोबत युक्ती केली. त्यानंतर मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युतीसंदर्भात चर्चा सुरू होती. मात्र अशातच ठाकरे गटासोबत युती करण्यास वंचित बहुजन आघाडीनं होकार दिला आहे.
मुंबईत एका कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर एकत्र आल्यानंतर पडद्यामागे या प्रक्रियेस गतीही मिळाली होती. त्यावर शिक्कामोर्तब झालं असून शिवसेनेशी युती करण्यास वंचित बहुजन आघाडीनं होकार दिला आहे. त्यामुळं राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखा ठाकूर यांनी उद्धव ठाकरे गटातील नेते सुभाष देसाई यांच्याशी दोन बैठका झाल्या असल्याचे सांगितले. आम्ही उद्धव ठाकरे गटाशी युती करण्यास तयार आहोत, असे रेखा ठाकूर यांनी सांगितले आहे.
सध्या शिवसेना महाविकास आघाडीचा भाग आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांपैकी शिवसेना हादेखील एक पक्ष आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीतील चौथा पक्ष असेल की शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार, याबाबत आम्हाला निश्चितता हवी आहे. त्यानंतरच पुढचे बोलणे सुरू होईल,” असे रेखा ठाकूर यांनी सांगितले.