नांदेड : भारत जोडो यात्रेनिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या महाराष्ट्रात आहे. मात्र, याच दरम्यान, दुसरीकडे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या २६ नेत्यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मतदानासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिले असताना काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.
काँग्रेसच्या जवळपास २६ नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला असून भाजपात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. १२ नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर, १२ डिसेंबर रोजी निकाल आहे. मात्र, त्यापूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांनी राजीनामा दिल्याने हा काँग्रेससाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जाते.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, भाजपचे हिमाचल प्रदेश निवडणूक प्रभारी सुधान सिंग भाजपचे शिमल्यातील उमेदवार संजय सूद हे यावेळी उपस्थित होते. काँग्रेस सोडणाऱ्या २६ नेत्यांमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सचिव धरमपाल ठाकूर खंड यांचाही समावेश आहे. पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री ठाकूर यांनी भाजपाच्या ऐतिहासिक विजयासाठी आपण सगळे मिळून काम करुयात, असं आवाहन त्यांनी केलं आहे.