जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील पंचक गावचे आरपीएफ जवान अक्षय सोये यांच्यामुळे एक मोठा अनर्थ टाळला. तो म्हणजे लहान मुलाला घेऊन लोकलमध्ये चढत असताना एका महिलेचा तोल जाऊन खाली पडत असताना त्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या आरपीएफचे जवान अक्षय सोये यांनी मोठ्या हिमतीने रेल्वेखाली जाणाऱ्या बाळाला वाचवलं आहे. ही संपूर्ण थरारक घटना रेल्वे स्थानकावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. दरम्यान, अक्षय सोये यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेमकी काय आहे घटना?
बिहारमधील सुमन सिंह नामक महिला तिच्या कुटुंबियांसह मुंबईतील कौपरखैने भागात राहते. महिला तिच्या एक वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन मुंबादेवीच्या दर्शनाला जात होती. त्यासाठी ती मानखुर्द रेल्वे स्थानकावर काल मंगळवारी दुपारी आली. यावेळी सीएसएमटीकडे जाणारी लोकल आली असता सुमन यांनी त्यांच्या कडेवर असणाऱ्या बाळासह डब्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
Video : लोकलमध्ये चढताना पाय घसरला, लेकरासह आई रेल्वेखाली; आरपीएफच्या जवानामुळे अनर्थ टळला.#Mumbailocal pic.twitter.com/WOAhzhhIcS
— Maharashtra Times (@mataonline) November 2, 2022
त्यादरम्यान प्रवेशद्वारावर असणारी गर्दी आणि लोकलने पकडलेल्या वेगामुळे सुमन यांना चढता आले नाही. लोकलमध्ये चढतांना तिचा पाय घसरला आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकली. हे पाहून शेजारी उभे असणारे रेल्वे कर्मचारी अक्षय सोये यांनी तात्काळ त्या बाळाला हातावर झेलले; तर सुमन यांनी लोकलचा दरवाजा पकडून ठेवल्यामुळे त्या फलाटाच्या अखेरपर्यंत फरफटत गेल्या. अखेर फलाटाच्या शेवटच्या टोकाला असणाऱ्या एका प्रवाशाने सतर्कता दाखवून सुमन यांना बाहेर ओढून घेत लोकलखाली जाण्याआधीच वाचवले.
महिला व तिचा एक वर्षाचा मुलगा दोघेही सुखरुप आहे. “देवानेच तुम्हाला माझ्या मुलाला वाचविण्यासाठी पाठविले होते. तुम्ही देवासारखे धावून आले, तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही”, अशा शब्दात अपघातातून बचावलेल्या महिलेने आरपीएफ जवान अक्षय सोये यांचे आभार मानले. आरपीएफ जवान अक्षय सोये हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील पंचक गावचे आहेत. ते रेल्वे सुरक्षा बलात सीआयबी या विभागात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दाखवलेले धाडस आणि समयसूचकतेमुळे बाळाचे प्राण वाचले असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.