दुमका : झारखंडमधील दुमका येथे एक धक्कादायक घटना समोर आलीय. विवाहित प्रियकराने तरुणीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले. या विवाहित तरुणाला बळजबरीने तिच्याशी लग्न करायचे होते. मात्र, कुटुंबीयांनी नकार दिल्यानंतर त्याने तरुणीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले. मारुती कुमारी असे या तरुणीचे नाव आहे तर राजेश राऊत असं आरोपी विवाहित प्रियकराचे नाव आहे. मुलीला गंभीर अवस्थेत दुमका येथून रांची येथील रिम्समध्ये दाखल करण्यात आले. जिथे उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपी राजेश राऊत हा पाकूर जिल्ह्यातील महेशपूर पोलिस स्टेशन हद्दीतील रामगढचा रहिवासी आहे. मारुती कुमारी आणि राजेश राऊत 2019 मध्ये मित्र झाले होते. मात्र याचवर्षी फेब्रुवारीमध्ये राजेश राऊतचे लग्न दुसरीकडे झाले. यानंतर मारुतीच्या कुटुंबीयांनीही तिच्या लग्नासाठी मुलगा शोधण्यास सुरुवात केली. मात्र राजेशला तिच्याशी लग्न करायचे होते. मुलीचे कुटुंबीय यासाठी तयार नव्हते. याचाच राग आल्याने त्यांने तिला पेट्रोल टाकून पेटवले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी 70 टक्के भाजली होती. तिला प्रथम फूल झानो मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने रांचीच्या रिम्समध्ये रेफर करण्यात आले आहे. मात्र उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला.
जखमी अवस्थेत तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबानीत आरोपीशी लग्न करण्यास नकार दिल्याचे सांगितले होते. त्यामुळे संतापलेल्या तरुणाने पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळले. ही घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांनी अथक परिश्रमानंतर आरोपीला अटक केली आहे.