जळगाव : जळगावात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसते आहे. जळगाव शहरात आज एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रहीम शहा मोहम्मद शहा उर्फ रमा (वय-२८) असे मयताचे नाव असून याप्रकरणी शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
जळगाव शहरातील शाहू नगर परिसरात असलेल्या जळकी मील ते रेल्वे ट्रॅक दरम्यान असलेल्या गटारीत आज बुधवारी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. जवळच रक्त आणि काही दगड पडलेले असल्याने तरुणाचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत होता.
घटनास्थळी मयताच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला असून बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, रहीम शहा याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत असून दुपारी त्याला तीन तरुणसोबत घेऊन गेले होते अशी माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली.
शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी लागलीच संशयितांची माहिती काढून खान्देश सेंट्रल परिसरातून तिघांना ताब्यात घेतले आहे. विलास, पवन अशी संशयितांची नावे आहेत. वारंवार शिवीगाळ करीत असल्याने आणि आर्थिक विषयामुळे खून केल्याची माहिती तिघांनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तेजस मराठे व योगेश इंधाटे यांना संशयितांची गुप्त माहिती मिळाली होती.