दिल्ली – GST परिषदेने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली आज 47 वी बैठक पार पडली असून आजच्या महत्वपूर्ण बैठकीत विविध वस्तूंवर वस्तू आणि सेवा कर आकारणीबाबत निर्णय घेण्यात आले. परिषदेने बैठकीत अनेक नवीन वस्तू जीएसटीच्या कक्षेत आणण्यास सहमती दर्शवली आहे जी पूर्वी करमुक्त होती. यामुळे आधीच अभूतपूर्व महागाईच्या दबावाखाली होरपळत असलेल्या सामान्य माणसाचे घरगुती बजेट वाढणार आहे.
महत्वाचे म्हणजे आता तुमच्या बॅंकेच्या पासबुकवरही तुम्हाला तब्बल १८ टक्के जीएसटी लागणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.१८ जुलैपासून तुमच्या बॅंकेच्या पासबुकवर जीएसटी आकारला जाणार आहे. पॅक बंद लस्सी, पनीर, दूध, मध, गहू या वस्तू सुद्धा महाग होणार आहेत. सर्व पॅकबंद खाद्यपदार्थांवर आता ५ टक्के जीएसटी लावला जाणार आहे त्यामुळे पॅक बंद खाद्यपदार्थांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होणार आहे.
संपूर्ण यादी वाचा….
- हॉटेल रुम आणि रुग्णालयातील बेड – प्रतिदिवस हजार रुपयांपेक्षा कमी दराच्या हॉटेल रुमवर १२ टक्के जीएसटी लागू होईल. तसेच रुग्णालयांमधील ज्या बेडचे दर प्रतिदिवस ५ हजारांपेक्षा अधिक आहेत अशा खाटांवर ५ टक्के कर आकारला जाईल.
- बॅंक चेकबुक – चेक जारी करण्यासाठी बॅंकांकडून आकारलेल्या शुल्कावर १८ टक्के जीएसटी आकारला जाईल.
- पॅकबंद अन्न – दही, लस्सी, पनीर, मध, गहू, मांस यासारख्या प्री-पॅक खाद्यपदार्थांवर ५ टक्के जीएसटी आकारला जाईल.
- एलईडी लॅम्प – एलईडी लाईट आणि लॅम्प यांच्यावरील कर १२ वरून १८ टक्के करण्यात आला आहे. कटिंग ब्लेड, पेपर चाकू, आणि पेन्सिल शार्पनरवर १८ टक्के कर आकारला जाईल.
- पंप आणि मशिन – सायकल पंप, टर्बाइन पंप आणि सबमर्सिबल पंपांवर आता १८ टक्के कर आकारला जाईल. सोलर वॉटर हीटर्सवरही १२ टक्के कर आकारला जाईल याआधी हा कर ५ टक्के होता.