जळगाव : राज्यातील सत्तांतर नाट्य आटोपल्यानंतर शिवसेनेतील सर्व बंडखोर आमदार स्वगृही परतले आहे. शिवसेनेतील फुटीच्या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदारांवर टीका केली जात आहे. दरम्यान अशात शिंदे गटातील आमदार चिमणराव पाटील आणि एका शिवसैनिकाच्या फोनवरील संवादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये चिमणराव पाटलांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.
“शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटलांनी आपल्याला खूप त्रास दिलाय. मी माझया व्यथा मांडायला भिकाऱ्यासारखं पक्षश्रेष्ठींच्या मागे फिरायचो. मंत्रिपद आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. पण त्रास होत असल्याने बंडखोरी केली. इथं न्याय मिळत नव्हता, आता जे व्हायचं ते होईल”, असे धक्कादायक खुलासे चिमणराव पाटील यांनी ऑडिओ क्लिपमध्ये केले आहेत.
ऑडिओ क्लिपमधील संभाषण जसंच्या तसं :
कार्यकर्ता : जय महाराष्ट्र आबासाहेब!
चिमणराव पाटील : जय महाराष्ट्र!
कार्यकर्ता : प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या चाललेल्या आहेत.
चिमणराव पाटील : हो, कोण बोलतोय?
कार्यकर्ता : जामनेरवरुन बोलतोय आबा शिवसैनिक!
चिमणराव पाटील : हा, बोला
कार्यकर्ता : साहेब, बातम्या ऐकून मोठा धक्का बसला. आपण साहेबांमागे राहावं, अशी आमची इच्छा आहे.
चिमणराव पाटील : मला माझ्या तालुक्यात स्थानिक शिवसेनावाल्यांनी काय त्रास दिलाय ते तुम्हाला माहिती नाही.
कार्यकर्ता : हो साहेब, मला माहिती आहे
चिमणराव पाटील : मला खूप त्रास दिलेला आहे.
कार्यकर्ता : तुम्हाला गुलाब भाऊ पासून त्रास आहे ते मी तुम्हाला सांगतो.
चिमणराव पाटील : तेच ना मग! तिथूनच त्रास आहे ना मग. यांना सांगून सांगून अक्षरश: कंटाळलो होतो. माझ्याकडे लक्ष द्यायचे नाहीत. यांच्यामागे भिकाऱ्यासारखा फिरायचो. मी आमदार झालो. पण मला निधी नाही. माझ्या मतदारसंघात येवून कार्यक्रमात करत होते. माझ्याकडे एकानेही लक्ष दिलं नाही. तुम्ही माझ्या जागेवर राहिले असते तर काय केलं असतं?
कार्यकर्ता : आबासाहेब मी तुमचा चाहता आणि फॅन आहे.
चिमणराव पाटील : त्यांनी मला इतका त्रास दिला की मी शिवसेनेत राहू नये, अशी परिस्थिती निर्माण केली.
कार्यकर्ता : गुलाबभाऊंनीच तसं केलं होतं. हे मला पूर्ण माहिती आहे.
चिमणराव पाटील : मग
कार्यकर्ता : तुम्ही गुलाबभाऊच्या विरोधात मधल्या काळात बंडही पुकारलं होतं.
चिमणराव पाटील : मी स्वत: उद्धव साहेबांना भेटून सांगितलं की मला खूप त्रास होतोय. तरी काही नाही. त्यांनी मला 2014 साली पाडलं. पण तरी त्यांना मंत्री केलं.
कार्यकर्ता : हो, तुम्हाला पाडलं होतं. सतीश आण्णा निवडून आले होते.
चिमणराव पाटील : किती दिवस सहन करायचं? मरायचं का मग?
कार्यकर्ता : वाह, वाह. आबा आता पुढे कसं होईल?
चिमणराव पाटील : बघु आता जे होईल ते होईल. आता मला न्यायच मिळत नव्हता. माणूस काय करणार आता? डायरेक्ट उद्घाटनाला यायचे ते. मला माहितही नसायचं.
कार्यकर्ता : आबा जळगाव जिल्ह्यात सगळ्याच जास्त अन्याय तुमच्यावर झाले.
चिमणराव पाटील : मी इतकं सहन केलं. मी खान्देशी माणूस आहे. अतिशय वाईटपणे सहन केलं.
कार्यकर्ता : आबा, तुमची निष्ठाबघून तुम्हालाच न्याय दिला पाहिजे होता.
चिमणराव पाटील : मला फळ दिलं नसतं तरी चाललं असतं. खरं वागून त्रास दिला. मी उद्धव साहेबांना सांगितलं, साहेब मला 29 वर्षे झाली. इतक्या वर्षात माझी एकतरी चूक दाखवा. आपल्यापेक्षा कार्यकर्तेच जास्त वैतागले होते. माझ्याविरोधात पोलिसांना सुद्धा फोन करायचा.
कार्यकर्ता : आबा तिथे गुलाबभाऊपण आहेत मग?
चिमणराव पाटील : होऊदे की मग. एवढा मंत्री असून फुटेल असं वाटलं नव्हतं.
कार्यकर्ता : यांचे दहा जन्मे झाले असते तरी उद्धव साहेबांचे उपकार यांच्याकडून फिटले नसते. एकनाथ शिंदे यांना सांगितलं आहे. मी यांच्याबरोबर आता राहू शकत नाहीत.
चिमणराव पाटील : मला मंत्रिपदाचं आकर्षण नाही. पण मला रोजचा त्रास होता.