मुंबई,(प्रतिनिधी)- महाविकास आघाडीला आता विरोधी बाकावर बसावं लागणार असल्याने महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष नेता होणार हे निश्चित होतं मात्र कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल या बाबत सर्वाना उत्सुकता होती आज अखेर राष्ट्रवादी पक्षाने विधानसभेतील विरोधी पक्ष नेता म्हणून अजितदादा पवार यांची वर्णी लावली आहे.
एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीला आता विरोधी बाकावर बसावे लागले आहे. राष्ट्रवादीमधून विरोधी पक्षनेतेपदी कुणाची निवड होणार अशी चर्चा रंगली होती. अखेरीस आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे.काल सायंकाळी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. यावेळी अजित पवारांना विधानसभा विरोधी पक्षनेतेपद द्यावं, अशी मागणी आमदारांनी केली. या पदाला अजितदादा योग्य न्याय देऊ शकतात, असं मत आमदारांनी व्यक्त केलं होतं दरम्यान आज त्यांची विधानसभेच्या विरोधी पक्ष नेता म्हणून निवड करण्यात आली आहे.
महाविकास आघाडी सरकार मध्ये गेले अडीच वर्ष देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेता या पदावर होते तर अजित पवार उपमुख्यमंत्री होते. मात्र, आता सरकार बदललं असल्याने शिंदे सरकार मध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत, तर अजित पवार आणि फडणवीसांची जागा घेतली आहे.