मुंबई : आज शिंदे गटातील बंडखोरीचा पाचवा दिवस आहेत. शिवसेनेचे जवळपास ४० हून अधिक आमदार गुवाहाटी मध्ये शिंदे गटात दाखल झाल्याने शिवसेना हादरून गेली आहे. आता शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांना अपात्र ठरवावं अशा आशयाची मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केली होती. त्यावर आता 16 आमदारांना 48 तासांच्या आत त्यांचं मत माडण्यासाठी सागण्यात आलं आहे. या आमदारांनी त्यांचं मत मांडलं नाही, तर त्यांना अपात्र ठरवलं जाणार आहे. त्यामुळे बंडखोरांना आता शिवसेनेचं कवच सोडावं लागणार आहे.
आजपासून सर्वांना नोटिसा जातील आणि त्यांना सोमवार पर्यंत वेळ देण्यात येईल, यावर त्यांना उत्तर द्यायचं आहे असं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेने 16 आमदारांच्या अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर काल चर्चा झाली. या विषयावर सलग तब्बल चार तासांपासून चर्चा सुरु होती.
अखेर रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास महाधिवक्ता देखील विधान भवनात दाखल झाले. त्यानंतर नरहरी झिरवळ आणि इतर नेत्यांसोबत त्यांची बैठक झाली. या बैठकीत अखेर बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याची नोटीस काढण्याचा निर्णय घेण्यात आली. दरम्यान, बंडखोर आमदारांना नोटीसमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात येतील.