जळगाव : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे काल जळगाव दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना जळगावमध्ये सक्तवसुली संचालनालय (ED), केंद्रीय तपास यंत्रणा, केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर सडेतोड टीका केली आहे. ईडीची किंमत आमच्या राज्यातील शेतकऱ्यांच्या विडीपेक्षाही कमी आहे, असे वक्तव्य मंत्री धनंजय मुंडे यांनी करत टीकेचे प्रहार केले आहेत. इतके सगळे करूनही महाविकास आघाडी सरकारला त्यांना काही करता आले नसल्याचे ते पुढे म्हणाले.
मागील अडीच वर्षात यांनी काय वापरले नाही?, ईडीची तर चवच गेली. शेतकऱ्याच्या विडीची किंमत तरी जास्त आहे, मात्र ईडीची किंमत नाही. इतके सगळे करूनही ते महाविकास आघाडीच्या सरकारला काहीच करता आले नाही.
भाऊ एकनाथ खडसे म्हणाले ते खरे आहे. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद तर आहेच. भाऊ आल्यानंतर तर ती ताकद द्विगुणित झाली आहे. मात्र ही ताकद आकड्यात दिसायला हवी. ती आमदारांच्या आकड्यात दिसली पाहिजे, ती खासदारांच्या आकड्यात दिसली पाहिजे, ती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आकड्यात दिसली पाहिजे, ती नगरपालिकेच्या आकड्यात दिसली पाहिजे, महानगरपालिकेच्या आणि नगरपंचायतीच्या आकड्यात सुद्धा दिसली पाहिजे, असे आवाहन मुंडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.