मुंबई: ओबीसी आरक्षणावरील अंतिम सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम २ आठवड्यात जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानंतर भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका होत आहे. त्यातच राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर ब्राह्मण व्यक्ती बसवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले होते. आता यावरून पालकमंत्री गुलाबराव यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं.
“मुख्यमंत्री कोणत्याही जातीचा होऊ शकतो. पण तो महाराष्ट्राचाच असला पाहिजे, अशी सर्वांची इच्छा असते. मागच्याकाळात मनोहर जोशी, देवेंद्रजी ब्राह्मण होते. पोटाला जात नसते, जातीला पोट असतं असं लोक म्हणतात. मुख्यमंत्री होण्याकरता गुणांचा विचार करावा, जातीचा विचार करु नये” असं शिवसेना नेते गुलाबराव पाटील म्हणाले.
ओबीसी आरक्षण संदर्भात सरकारने संपूर्ण प्रयत्न केले. न्यायालयात सरकारने ची बाजू मांडायची होती ती मांडली. डाटा द्यायचा होता तो दिला. मात्र न्यायालयाने आता दिलेला निकाल सर्वांना मान्य करावाच लागेल. सुप्रीम कोर्ट शिवसेनेचे नाही ना? असे मनात म्हणजे गुलाबराव पाटील यांनी टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना लक्ष्य केले.
हिंदुत्व तसेच सद्यस्थितीत सुरू असलेल्या भोंग्याच्या प्रकरणावरून शिवसेनेवर टीका करणाऱ्या विरोधकांवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला. आता देवावरून राजकारण सुरू आहे. आता देवालाही पक्षात घ्यायला लागले का ?, असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे. यांच्याकडे हिंदुत्त्वाचं सर्टिफिकेट देण्याची फॅक्टरी आहे का? असा सवाल उपस्थित करत मंत्री गुलाबराव पाटील यांनी कडाडून टीका केली आहे.