जळगाव : जळगावमध्ये अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन असल्यापासून तर मुलगी सज्ञान होईपर्यंत तिच्यावर तब्बल ८ वर्षापर्यंत बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. याबाबत पीडितेने जळगाव शहर पोलीस गाठून फिर्याद दिली असून त्यानुसार ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत असल्यामुळे खरंच महिला व लहान बालके सुरक्षित आहेत का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
काय आहे घटना?
भुसावळातील २२ वर्षीय तरूणी सध्या जळगावात राहत आहे. ८ वर्षांपूर्वी म्हणजे तिचे वय १४ वर्ष असतांना ती भुसावळातील एका शाळेत शिक्षण घेत होती. त्यावेळी तिच्यावर रितेश सुनिल बाविस्कर (रा. जुना सातारा, भुसावळ) याने ८ वर्षांपासून म्हणजेच २०१४ पासून ते आजपर्यंत ती अल्पवयीन आहे हे माहिती असतानाही तिच्यावर अत्याचार केला.
तरूणी व तिच्या मैत्रीणी यांचे शाळेत केव्हातरी फोटो काढून ते समाजात व शाळेत व्हायरल करेल अशी धमकी देऊन तरूणीस मोटारसायकलवर जबरदस्तीने बसवून त्याच मोटारसायकलवर बंटी (रा.भुसावळ) व राहुल (रा.भुसावळ) यांना बसवून इंजीनघाट परीसरात घेऊन जाऊन तरुणीसोबत शारीरीक संबंध प्रस्थापित केले. तसेच तरुणीच्या उजव्या हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी व २०० रूपये तसेच डाव्या हातातील बोटातील सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेतली.
तसेच रितेश सांगितले की, ‘तू जर कोणाला काही सांगितले तर तुझे फोटो व्हायरल करील’ अशी धमकी दिली. त्याचप्रमाणे रितेशची आई शोभा बाविस्कर आणि बहीण यांनी देखील तरुणीस ‘तु तुझे घरातुन पैसे चोरून आण नाहीतर तुझे फोटो व्हायरल करेल’ अशी धमकी दिली. उर्वेश पाटील (रा. भुसावळ) याने संशयित आरोपी शोभा सुनील बाविस्कर हिच्याशी संगणमत करून शोभा बाविस्कर हिच्या लग्नासाठी ५० ते ६० हजाराची मागणी केली. पीडित तरुणीने घाबरून ५० हजार रुपये त्यांना दिले. रितेश सुनील बाविस्कर याने तरुणीसोबत वेळोवेळी शारीरिक संबध प्रस्थापित करून तीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तरुणीची ७ ग्रॅम सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतली.
याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात रितेश सुनील बाविस्कर, शोभा सुनील बाविस्कर, नंदिनी राहूल कोळी, सुनील बाविस्कर, उर्वेश पाटील, बंटी, राहुल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास अरुण सोनार हे करीत आहेत.