मुंबई : गेल्या अडीच वर्षात शिवसेनेने सत्तेसाठी हिंदूत्व सोडल्याची टीका वारंवार भाजप करत आहे. आता पुन्हा हिंदूत्व आणि हनुमान चालीसा यावरून राजकारण तापलं आहे. हिंदुत्वावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला होता. घंटाधारी लोकांनी गदाधारी लोकांना शिकवू नये, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजपवर निशाणा साधलाय. विरोधकांना सुनावणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर काही वेळातच भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार पलटवार केला आहे.
यांचं नवं हिंदुत्व ते किती मानतात , ते यांच्या कृतीतून दिसलं. उद्धव ठाकरेंनी नवं हिंदुत्वाची भाषा करायची विसरावी, त्यांनी स्वतःला सेक्युलर म्हणायला सुरू करावं , घाबरतात कशाला ? असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. तसेच सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या समोर झुकताय म्हणून तर मुख्यमंत्र्यांना मानेचा त्रास होतोय, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. नवं हिंदुत्व सोडून द्या , तुमच्या तोंडी ते शोभत नाही, तसेच चला आता सोडा त्या उद्धव ठाकरेंना ते स्टेरॉइड घेऊन बोलतात, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.