जळगाव : शहराला लागून असलेल्या खेडी जवळील पेट्रोल पंपाजवळ सायकलस्वार तरुणाला वाचवण्याच्या नादात पोलीस व्हॅनने कारला धडक दिल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून त्यात ऑटो रिक्षा चालकाच्या मूर्खपणामुळे हा भीषण अपघात झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.दरम्यान, या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
ऑटो रिक्षा चालकाने प्रवासी उतरवण्यासाठी ड्रायव्हरच्या साईडचे फाटक उघडले. या फाटकाची धडक लागल्यामुळे रस्त्यावर मागून आलेला सायकलस्वार खाली पडला. रस्त्यावर पडलेल्या सायकलस्वाराला वाचवताना जळगावातून मुक्ताईनगरला आरसीपीचे प्लाटून घेऊन जात असलेली पोलीस वाहन कारला आदळली
अपघात सीसीटीव्हीत कैद
या अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा व्हिडिओ समोरील दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून जळगाव जिल्ह्यातील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रहदारीच्या बाजूने गाडीतून उतरणं टाळावं, हा धडा या अपघातामुळे अधोरेखित झाला आहे.