हैदराबाद : हैदराबाद येथील भोईगुडा भागातील एका रद्दीच्या गोदामाला आज बुधवारी पहाटे भीषण आग लागली, त्यानंतर अनेक लोक गोदामात अडकले. त्याचबरोबर या अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून, त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सर्व मजूर बिहारचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सुमारे 8 गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आणि अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणता आली.
कामगार गोदामात झोपले होते
पोलीस निरीक्षक मोहम्मद मुस्तफा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग एका रद्दीच्या गोदामाला लागली, त्यात काही लाकडी वस्तूही आहेत. सर्व मयत गोदामात झोपले होते व येथे काम करायचे. आगीचे कारण समजू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले. कचरा गोदामाला लागलेल्या आगीत सुमारे 11 मजुरांचे जळालेले अवशेष सापडले आहेत, तर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात एका मजुराचा जीव वाचला
गांधी नगरचे एसएचओ मोहन राव म्हणाले, “हैदराबादच्या भोईगुडा येथे एका भंगाराच्या दुकानाला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी उपस्थित 12 जणांपैकी एकाला वाचवण्यात यश आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांनी सांगितले की, माहिती मिळताच डीआरएफची टीम आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचली आणि आग आटोक्यात आणली. शॉक सर्किट हे आगीचे कारण असू शकते. आम्ही प्रकरणाचा तपास करत आहोत.
हैदराबादचे जिल्हाधिकारी एल शर्मन म्हणाले, ‘पहाटे चार वाजता आगीची घटना घडली. अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली. 11 जणांचा मृत्यू झाला असून एका व्यक्तीला गोदामातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तपासानंतर घटनेचे कारण समजेल.
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये नुकसानभरपाई
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भोईगुडा टिंबर डेपोला लागलेल्या आगीत बिहारमधील कामगारांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची सानुग्रह अनुदानाची घोषणा केली आणि या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांचे मृतदेह त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले.