औरंगाबाद : राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही तर कोण कधी कोणासोबत जाईल याचाही अंदाज लावणे अवघड असते. असाच काही राजकीय भूकंप आणणारी बातमी समोर येत आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपला हरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि एवढंच काय तर शिवसेनेसोबतची जाण्यास आम्ही तयार आहोत, असं वक्तव्य त्यांनी केलंय.
खासदार इम्तियाज जलील म्हणाले, एमआयएमवर वारंवार आरोप केला जातो की, आमच्यामुळे भाजपा जिंकून येते. उत्तर प्रदेशात आम्ही समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी या दोन्ही पक्षांना ऑफर दिली होती. तुम्हालाही भाजपला हरवायचे आहे आणि आम्हाचेही उद्दिष्ट हेच आहे की, या देशातून भारतीय जनता पार्टीला नष्ट करायचे. महाराष्ट्रातदेखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच आरोप केले आहेत की, एमआयएममुळे भाजपाला मते मिळतात. त्यामुळे आता आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
‘आम्ही तर प्रस्ताव दिलाय….’
महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रस्ताव दिल्याचे सांगताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले, ‘ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत माझी एक बैठक झाली. तेव्हा आम्हीच त्यांना प्रस्ताव दिला की एमआयएम काँग्रेस आणि राष्ट्रवादसोबत जाण्यास तयार आहे. आम्ही ते काय करतात ते पाहू… असं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलं.