मुंबई : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासंदर्भात कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन मंत्रालयात करण्यात आले. या बैठकीस कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ॲग्रीबीजचे तज्ज्ञ मेघना केळकर, जिल्हा कृषी अधिकारी श्री.सोनावणे, कृषि विद्यावेता विजय केळकर, कृषी विभागाचे अवर सचिव श्रीकांत आडगे, जी.आय.एस. तज्ज्ञ नितिन बनकर तसेच मालेगावातील लोकप्रतिनिधी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
कृषिमंत्री श्री. भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्धवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायशीर करण्यास सहाय्य करणे हे नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे उद्दिष्ट असून मालेगावातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प 5142 गावात सुरु असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनामुळे मालेगावातील 141 गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मालेगावातील शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. मालेगावतील पाऊस पडण्याचे प्रमाण पाहता या पाण्याचा जास्तीत जास्त चांगला वापर कसा करता येईल याचा अभ्यास करण्यात येईल. संपूर्ण गावाला विश्वासात घेऊन आराखडा तयार करण्यात येईल. गाव हा घटक मानून प्रकल्पाचे लोकसहभागीय नियोजन करावे. महिला शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रत्येक प्रकल्प गावात शेतीशाळेचे आयोजन करावे, असेही श्री.भुसे यांनी सांगितले.
प्रकल्प गावात राबवावयाच्या बाबी
वृक्षलागवड व बांबू लागवड, फळबाग लागवड, गांडुळ खत/नाडेप खत निर्मिती, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, वैयक्तिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, विहीर, विहीर पुनर्भरण, शेडनेट, पॉलीहाऊस व पॉली टनेल, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, परसातील कुक्कुटपालन, बिजोत्पादन रुंद वाफा व सरी प्रोत्साहन, शून्य मशागत तंत्रज्ञान इत्यादी बाबी या प्रकल्पाअंतर्गत शेतीमध्ये राबविता येतील.
हे पण वाचा :
वारकऱ्यांच्या दिंडीचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू
‘महाविकास आघाडीत सहभागी व्हायचं नव्हतं, मात्र…’, पटोलेंचं मोठं विधान
‘…तर जळगाव शहराचा सत्यानाश झाला नसता’ ; गुलाबरावांची गिरीश महाजनांवर टीका
सोने झाले स्वस्त, चांदीही घसरली, जाणून घ्या आठवडाभरातील सराफा बाजाराची स्थिती
या योजनेत गावातील शेतकरी व महिला गटांना तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना 60 टक्के अनुदान देण्यात येते. तसेच प्रकल्पातील विविध ॲपच्या माध्यमातून नियोजन करण्यात येते. या योजनेत जेवढ्या लोकांनी अर्ज केला आहे तेवढ्या लोकांना लाभ मिळू शकतो.
कार्यशाळा घेण्यात येणार : श्री. डवले
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प एक महत्वाचा असून कृषी मंत्री यांच्या पाठपुराव्याद्वारे मालेगावाच्या सर्वांगिण विकासासाठी चांगली संधी आहे. यासाठी गाव आराखडे तयार करुन मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे, असेही प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी यावेळी सांगितले.