बीड : राज्यात सत्तेपासून भाजपाला दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं होते. राज्यात महाविकास आघाडी सरकारला नुकतेच दोन वर्ष पूर्ण झाली आहे. मात्र, महाविकास आघाडीत सरकार स्थापन झाल्यानंतर अनेकदा मंत्र्यांमध्ये मतभेद आणि नाराजी असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. महाविकास आघाडीतील धुसफूस ही अजूनही तशीच धगधगती असल्याचं चित्र आहे. कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एका विधानावरुन काँग्रेस सरकारमध्ये सहभागी असूनही समाधानी नसल्याचं जाणवत आहे.
“भाजपला (BJP) सत्तेबाहेर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीसोबत सत्तेत आहोत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना या सरकारमध्ये यायचं नव्हतं. मात्र भाजपला सत्तेपासून दूर करायचं होतं. त्यामुळेच आम्ही यांच्यासोबत आलो. त्यामुळेच सोनिया यांनी सांगितलं होतं की, आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नको, पण पहिल्याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे, अशी अट घातली होती”, असं विधान नाना पटोले यांनी बीडमध्ये आयोजित कार्यक्रमात केलं.