जळगाव : कोरोना पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी माजी मंत्री गिरीश महाजनभाजपाचे नेते, तालुकाध्यक्ष आणि विधानसभा प्रमुख यांच्यासह एकूण 11 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वेगवेगळ्या भागात जमावबंदी लागू करण्यात आली होती. त्यानुसार पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आधीच दिला होता. अशातच महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी नियमित वीज पुरवठ्यापासून वंचित राहत असल्यानं सरकारचा निषेध करण्यासाठी गिरीश महाजन आणि भाजप कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता.
मात्र ही जमावबंदी झुगारत मोर्चा काढण्यानं गिरीश महाजनांसह 11 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याआधीही दाखल झालाय गुन्हा!
दरम्यान, आधीही जळगावात मोर्चा काढल्याप्रकरणी गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता. फक्त गिरीश महाजनच नव्हे तर त्यांच्यासह तब्बल 125 जणांविरोधात जळगावातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जमावबंदीचं पालन न केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजप कार्यकर्त्यांनी आमदार गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलन केलं होतं. त्यामुळे तेव्हाही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.