जळगाव : शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात ३० डिसेंबर रोजी झालेल्या दगडफेमध्ये जखमी झालेल्या तरुणाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शकील अली उस्मान अली (वय ३०, रा. शिवाजीनगर हुडको) असं मृत तरुणाचं नाव आहे.
याबाबत असे की, जळगावातील शिवाजीनगर हुडको परिसरात एका तरुणाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असतानाच दुसऱ्या गटातील तरुणाने डीपीवर काठी मारुन वीजपुरवठा खंडीत केला. याचा राग आल्यामुळे दोन गटात बाचाबाची झाली. यात दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. या दंगलप्रकरणी रणजीत उर्फ बबलु हिरालाल जोहरी व समीर शेरु खान उर्फ पप्या (वय १९) या दोघांनी शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्र फिर्यादी दिल्या आहेत. त्यानुसार परस्परविरोधी दंगलीचे गुन्हे दाखल आहेत.
ही दंगल सुरू असतानाच मृत शकील हा घरातच होता. आपला शेजारी राहणारा भाचा दंगलीत अडकला आहे का? अशी काळजी करुन शकील त्याला पाहण्यासाठी घराबाहेर आला. खरं तर त्यावेळी त्याचा भाच घरातच होता. मात्र घराबाहेर पडलेल्या शकीलच्या डोक्याला दगडफेकीत एक दगड लागला. यामुळे खाली पडल्याने त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूलाही दुखापत झाली. शकीलवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानतंर तो घरी परतला होता. अस्वस्थ वाटत असल्याने दोन दिवसांपूर्वी पुन्हा शकीलला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच गुरुवारी दुपारी दोन वाजता त्याचा मृत्यू झाला.