कानपूर : उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एकतर्फी प्रेमातून नकार मिळताच संतापाच्या भरात तिघांनी मिळून एका विद्यार्थिनीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून तिसरा संशयीत पसार झाला आहे. ही मुलगी एमएससीची विद्यार्थिनी होती.
हत्या झालेल्या विद्यार्थिनीवर सोमनाथ नावाचा विद्यार्थी एकतर्फी प्रेम करायचा. त्याचे वडिलदेखील पोलीस खात्यात काम करायचे. आरोपींनी विद्यार्थीनीला ज्यूसमध्ये नशेच्या गोळ्या टाकून तो ज्यूस प्यायला दिला होता. ज्यूस प्यायल्यानंतर विद्यार्थीनीला धुंदी आली. तिला नशा चढल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपी विद्यार्थ्यांनी गळा दाबून मुलीची हत्या केली.
दोघांना अटक ; तिसरा आरोपी फरार
मुलीच्या हत्येची घटना 29 डिसेंबरला घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर तिसरा आरोपी फरार झाल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी आज दिली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्याने मुलीला तिच्यावर आपले प्रेम असल्याचे सांगितले. त्याने प्रपोज केले, मात्र मुलीने त्याच्या प्रेमाचा स्विकार करण्यास स्पष्ट नकार कळवला. त्याचा राग आरोपी तरुणाच्या मनात खदखदत होता. त्याच नाराजीतून एकतर्फी प्रेम करणाऱ्या विद्यार्थ्याने हत्येचा कट रचला. त्यानुसार मुलीला 29 डिसेंबरला बोलावून घेण्यात आले व नशेच्या गोळ्या टाकलेला ज्यूस प्यायला देण्यात आला. ती नशेत गेल्याचे दिसून आल्यानंतर गळा आवळून तिचा खून करण्यात आला.
मृतदेह पुलाखाली फेकला
आरोपींनी नशेच्या गोळ्या खाल्लेली मुलगी पुन्हा शुद्धीवर येऊन प्रतिकार करेल, या शक्यतेने तिचे हातपाय तारेने बांधले होते. तिची हत्या केल्यानंतर मृतदेह जवळपास चार तास कारमध्ये फिरवला. यादरम्यान काही ठिकाणी पोलिसही दिसले होते. रात्रीच्या वेळी त्यांनी मुलीचा मृतदेह पुलाखाली फेकून दिला आणि ते फरार झाले. यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून तिसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे.