सावदा (प्रतिनिधी) : वधूच्या अंगावरील हळदीचा रंग व हातावरील मेहंदी जशीच्यातशी असताना तिच्या कपाळावरील कुंकू पुसण्याची वेळ आली आहे. लग्नाला अवघे आठच दिवस झाले असता तरुणाचा दीपनगर येथून कामावरून घरी परतत असताना फुलगावच्या ओव्हर ब्रिजजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. सचिन चिंतामण चौधरी (वय २६) असे या तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
दिपनगर (ता. भुसावळ) येथील पावर हाउसमध्ये नोकरीवर असलेल्या सचिनचे लग्न आठ दिवसांपुर्वी मोठ्या थाटामाटात आप्तेष्ट मित्र परिवाराच्या साक्षीने भोकरी (ता. मुक्ताईनगर) येथे झाले. या लग्न सोहळ्यातील वर- वधुच्या अंगावरची हळद अजून उतरायचीच होती. सनई चौघड्यांचा आवाज अजूनही घरात दुणावत होता. वऱ्हाडी मंडळी लग्नाच्या चर्चेत गुंग असतांना काळाने घात केला. कामावरून घरी परतत असतांना झालेल्या दुर्दैवी अपघातात नववरांचा जागीच मृत्यू झाला.
उधळी (ता.रावेर) येथील चिंतामण चौधरी यांचा मुलगा सचिन तर भोकरी (ता.मुक्ताईनगर) येथील समाधान वामन पाटील यांच्या कन्येशी मोठ्या थाटामाटात २४ डिसेंबरला विवाह पार पडला. नव दाम्पत्याच्या अंगावर हळद ओली होती. हातावर मेहंदी सजलेली होती. संसार वेल बहरण्याच्या मार्गावर होती व काळाने घात केला. कानात शिसे ओतल्याप्रमाणे उदळीत दुर्दैवी घटनेची बातमी आल्याने सगळा परीवार सुन्न झाला. ३० डिसेंबरला दीपनगर येथून कामावरून घरी येत असताना रात्री साडे दहाच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान ३१ रोजी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी उपस्थितांचे डोळेही पाणावले होते.