नवी दिल्ली : परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्यातुन एका एमबीबीएस (MBBS) अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. दिव्या यादव असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय दिव्या यादव ही दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. गुरुवारी ती कॉलेजमधील संजीवनी या मुलींच्या जुन्या वसतिगृहातील खोली क्रमांक 64 मध्ये पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. वसतिगृहाची ही खोली रिकामी असायची.
खोली आतून बंद असल्याने वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला. मात्र, तोपर्यंत दिव्याचा मृत्यू झाला होता. ही बाब पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिचा मृतदेह फासावरुन बाहेर काढला आणि पंचनामा करुन पोस्टमार्टमसाठी पाठवला. चौकशीदरम्यान, दिव्याच्या रुम पार्टनर्सकडून माहिती मिळाली की दिव्या नुकत्याच झालेल्या दोन पेपरमध्ये नापास झाली होती. 29 डिसेंबरला संध्याकाळी निकाल जाहीर झाला, तेव्हापासून ती निराशेत होती.