एरंडोल : येथील कासोदा रोडवरील तुरीच्या शेतात मध्य प्रदेशातील २९ वर्षीय तरुणाने विषारी औषधाचे सेवन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली.
येथील मारवाडी गल्लीतील महेश काबरा यांचे कासोदा रोडवर गट नंबर २७७मध्ये शेत आहे. ही शेती मागील पाच वर्षांपासून प्रकाश महाजन कसतात. दरम्यान, काबरा यांच्या तुरीच्या शेतात कामानिमित्त प्रकाश महाजन २६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास गेले होते. त्यावेळी त्यांना शेतातून घाण वास आला. ते वासाचे दिशेने गेले असता एक अनोळखी अंदाजे २९ वर्षाच्या तरुण जमिनीवर खाली मृत स्थितीत पडलेला त्यांना दिसला. तसेच त्याच्या बाजुला एक विषारी औषधाची बाटली हाेती.
त्याचा मोबाइल पडलेला हाेता. महाजन यांनी लागलीच एरंडोल पोलिस ठाण्यात ही माहिती दिली. पोलिसांनी आल्यानंतर मृताच्या खिशाची तपासणी केली असता खिशात एक पाकिट आढळले. त्यात पाकिटात सायसिंग (रा. साहदर, तीतरवांगली, ग्राम पंचायत सिरवेल, खरगोन, मध्य प्रदेश) व बालीबाई (रा. साहदर, मध्यप्रदेश) व राधे सायसिंग सोळंकी (रा. भडगाव रोड, विश्राम नगर, कासोदा) असे आधार-कार्ड आढळले. त्यामुळे मृत तरुण हा सायसिंग असल्याची खात्री झाली. दरम्यान, मृत रायसिंग याचे शवविच्छेदन करून त्याच्या मूळ गावी नेण्यात आले. याबाबत एरंडोल पोलिस ठाण्यात प्रकाश महाजन यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.