एरंडोल । येथील रोडरोलरचालकाने लिंबाच्या झाडाला दोराच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. क संतोष लक्ष्मण महाजन (वय ४९) असे मृताचे नाव असून या प्राैढाच्या खिशात सुसाइड नाेट आढळून आली असून, ती पोलिसांनी (Police) जप्त केली आहे. त्यात चार जणांनी नावे आहेत.
याबाबत असे की, एरंडोल येथील संतोष महाजन यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाजवळील निसार मुजावर यांच्या शेतालगत असलेल्या पडिक शेतात निंबाच्या झाडास दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. दरम्यान, त्यांना झाडावरून खाली उतरवून एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तपासणी-अंती डाॅक्टारांनी त्यांना मृत घोषित केले. मृत संतोष महाजन हे रोलर चालक होते. त्यांच्या पश्चात २ मुले, १ मुलगी, जावई असा परिवार आहे. दरम्यान, मृत महाजन यांच्या अंगावरील जॅकेटच्या खिशात सुसाइड नोट आढळली असून ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या सुसाइड नाेटमध्ये चाैघांच्या नावांचा उल्लेख असून ही नोट तपासासाठी महत्वाचा दुवा ठरणार आहे.
चिठ्ठीत उल्लेख केलेल्यांवर गुन्हा दाखलची मागणी
मृत संतोष महाजन यांची मुले व त्यांचे नातेवाइकांनी सुसाइड नोटमध्ये असलेल्या नावांच्या व्यक्तींवर जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत आम्ही मृत महाजन यांचे शव ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पावित्रा घेतला हाेता. परंतु, पोलिस प्रशासनातर्फे मृताच्या नातेवाइकांची समजूत काढण्यात आली. आधी मृतावर अंत्यसंस्कार करा व पोलिस ठाण्यात येऊन गुन्हा दाखल करा, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर शाेकाकूल वातावरणात मृत महाजन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.