प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात कर्तव्यात निष्काळजीपणा करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. एडीजी झोनच्या सूचनेनुसार, एक उपनिरीक्षक आणि 8 कॉन्स्टेबलसह 9 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. हे पोलीस क्यूआरटी टीम-6 मध्ये सामील होते. हे आठही कॉन्स्टेबल कौशांबी जिल्ह्यातील सराय अकिल पोलीस ठाण्यातून आले होते. उपनिरीक्षक प्रयागराजमधील नवाबगंज पोलिस स्टेशनमध्ये तैनात होते.
खरं तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी यूपीमधील प्रयागराज येथे पोहोचले होते, जिथे त्यांनी 16 लाख महिलांना 1000 कोटींची भेट दिली. आपल्या प्रतिस्पर्ध्यांची खिल्ली उडवत पंतप्रधान म्हणाले की, मुलींसाठी लग्नाचे वय 21 पर्यंत वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे महिला खूश आहेत, परंतु काहींना त्रास होत आहे.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत देण्यात आलेल्या 30 लाख घरांपैकी 25 लाख घरांची नोंदणी उत्तर प्रदेशात महिलांच्या नावावर असल्याचे मोदी म्हणाले होते. यावरून महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारची कटिबद्धता दिसून येते.
ते म्हणाले होते, मुलींना पुढे शिकण्याची आणि वाढण्याची संधी मिळावी, म्हणून केंद्राने त्यांच्या लग्नाचे वय १८ वरून २१ वर्षे करण्याचा प्रयत्न केला. मात्र याचा त्रास कोणाला होतोय, हे सगळ्यांनाच दिसत आहे.
समाजवादी पक्षाचे खासदार शफीक उर रहमान आणि एसटी हसन यांनी लग्नाचे कायदेशीर वय वाढवण्याच्या केंद्राच्या निर्णयावर टीका केली. मात्र, सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी सपा पुरोगामी पक्ष असून खासदारांचे विचार वैयक्तिक असल्याचे सांगत या खासदारांच्या वक्तव्यापासून स्वत:ला दूर केले.