पुणे प्रतिनिधी | एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या आणखी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मल्हारी नामदेव बारवकर (२५ रा. देऊळगाव गाडा ता.दौंड जि. पुणे ) असे या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी आढळून आलेली आहे. दरम्यान त्याच्या परीक्षेच्या तयारीसाठी पैसा कमी पडू नये म्हणून वडिलांनी आपली जमीन विकल्याचे समोर आले आहे.
मल्हारी हा एमपीएससीची पूर्वपरीक्षेेची दिवसरात्र तयारी करत होता. त्याने दोन-तीन परीक्षेचे पेपरही दिले होते. मात्र, याच काळात आलेल्या नैराश्यातून राहत्या घरी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मल्हारी यांचे नातेवाइकांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली.
तुमची स्वप्ने पूर्ण करू शकत नाही…आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
आत्महत्या करण्यापूर्वी मल्हारी याने लिहून ठेवलेली एक चिट्ठी पोलिसांना सापडली आहे. मी तुम्हाला दाखवलेली स्वप्न पूर्ण करू शकत नाही आणि तुमचे पडलेले चेहरे पाहू शकत नाही. माझ्या आत्महत्येस कोणी जबाबदार नाही. अतिविचार, संपलेला आत्मविश्वास , भविष्यातही काही सकारात्मक दिसत नाही. चांगले जगण्याच्या सगळ्या आशा संपल्या आहेत, असे यात नमूद करण्यात आले आहे.