जळगाव : जिल्हा कारागृहातील कैद्याने जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना कैदी वॉर्डात चादरीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. रवींद्र रमेश निकम (वय २५) असे कैद्याचे नाव आहे.
भडगाव तालुक्यातील अत्याचाराच्या घटनेत संशयित निकम हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला फिट येण्याचा त्रास होत असल्याने ११ डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल केले आहे. मंगळवारी सकाळी त्याने पंख्याला चादर बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी गार्ड ड्यूटीवर असलेले हर्षल महाजन व विनय पाटील या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवले.
हा सर्व प्रकार रुग्णालयातील डॉक्टरांना कळवला. त्याला रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान रुग्णालयातील कैदी वॉर्डात यापूर्वीही अनेक आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या असल्याने या ठिकाणाहून वार्डातील पंखांच काढून घेण्यात आला आहे.