भुसावळ : भुसावळात एक धक्कादायक घटना समोर आलीय. कोरोना काळात रिक्षाची चाके थांबली. मुलाची नोकरी गेली अन् मुलीचा घटस्फोट झाला. नातेवाइकांनीही वाऱ्यावर सोडले. यामुळे आर्थिक विवंचनेसह मुलांची चिंता लागली. यातूनच एकाच कुटुंबातील चौघांनी उंदीर मारण्याचे आैषध प्राशन करून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक घटना घडलीय. भुसावळात त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
शहरातील वांजोळा रोडवरील प्रेरणानगर मागे गोकूळधाम रेसिडेन्सीत रिक्षाचालक विलास प्रदीप भोळे (वय ६०), पत्नी लताबाई विलास भोळे (वय ५२), मुलगी प्रेरणा विलास भोळे (वय २८) आणि मुलगा चेतन विलास भोळे (वय २७) हे राहतात. शुक्रवारी (दि.१०) दिवसभर भोळे यांचे घर बंद असल्याने परिसरातील रहिवाशांना शंका आली. त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, कोणीही प्रतिसाद देत नव्हते. चेतनच्या मोबाइलवरही संपर्क साधून प्रतिसाद नसल्याने रहिवाशांनी शुक्रवारी रात्री ११.३० वाजता पोलिसांना माहिती दिली.
यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यावर रिक्षाचालक विलास भोळेंसह परिवारातील चारही सदस्य बेशुद्ध आढळले. यानंतर पोलिस व रहिवाशांनी रात्री १२ वाजेच्या सुमारास अत्यवस्थ चौघांना डॉ.मानवतकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे उपचार केल्यानंतर डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालयात हलवण्यात आले. तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लताबाई भोळे यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असून, पोलिसांनी ती जप्त केली आहे. त्यातही त्यांनी विवंचनेचा मुद्दा मांडला आहे.