मुंबई : एसटीच्या विलीनीकरणावरून मागील गेल्या महिन्याभरापासून अंदोलन सुरूच आहे. भरघोस पगारवाढ करूनही एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. तर काही कर्मचारी कामावर रुजू झाले आहे. कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव पगार जमा केला आहे.
राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार 41 टक्के पगारवाढीसह 19 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आज पगार जमा झाले आहेत. एसटी संपकरी कर्मचार्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद देताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या घोषणा प्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता 12% वरून 28% करण्यात आला, घरभाडे भत्ता 8-16-24 या पटीत वाढवून देण्यात आला. तसेच अंतरिम वेतन वाढ देखील दिली. अशी माहिती देण्यात आली आहे. तर जे कर्मचारी संपावर आहेत त्याचे पगार झाले नाहीत. अजूनही जवळपास 72 हजार एसटी कर्मचारी संपावर आहेत.
250 पैकी 123 डेपो मध्ये वाहतूक सुरू
राज्यात दुपारपर्यंत 250 पैकी 123 डेपोमध्ये वाहतूक सुरू झाली आहे. रात्री उशिरापर्यंत हा आकडा आणखी वाडण्याची शक्यता आहे. तर संप चिघळल्याने आजही काही ठिकाणी एसटीवर दगडफेक झाल्याच्या घटना घडल्यााचं समोर आलं आहे. काही ठिकाणी वाहतूक सुरू करताना मोठा पोलीस बंदोबस्त लावल्याचंही पहायला मिळालं. राज्यात निलंबित कर्मचाऱ्यांची संख्याही जवळपास 10 हजारांच्या आसपास गेली आहे, तर सेवासमाप्तीची कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्याही तब्बल 2 हजारांच्या वर गेली आहे.