नवी दिल्ली : नवीन वर्षापासून म्हणजे १ जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. १ जानेवारीपासून ग्राहकांना नॉन-कॅश एटीएम व्यवहाराची मर्यादा ओलांडल्यानंतर आतापेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील. जून महिन्यातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) यावर शुल्क वाढवण्याची परवानगी दिली होती. काही दिवसांपूर्वी आयसीआयसीआय बँकेने शुल्क (एटीएम ट्रान्झॅक्शन चार्ज) वाढवण्याचे सांगितले होते आणि आता अॅक्सिस बँकेनेही शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे.
सध्या बँकेच्या एटीएम किंवा कॅश रिसायक्लर मशीनमधून रोख आणि नॉन-कॅश व्यवहारांसाठी महिन्यातील पहिले 5 आर्थिक व्यवहार विनामूल्य आहेत. यानंतर, प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी 20 रुपये शुल्क आकारले जाते. पण 1 जानेवारी 2022 पासून हे शुल्क प्रति आर्थिक व्यवहारासाठी 21 रुपये असेल. त्यांना मेट्रो शहरांमधील इतर बँकेच्या एटीएममधून 3 व्यवहार आणि मेट्रो नसलेल्या शहरांमधील अन्य बँकेच्या एटीएममधून 5 व्यवहार मोफत मिळत राहतील.
रिझर्व्ह बँकेने परिपत्रकात काय म्हटले?
रिझव्र्ह बँकेने या वर्षी जून महिन्यात एक परिपत्रक जारी करून हे स्पष्ट केले होते की, उच्च विनिमय शुल्क आणि खर्च वाढीमुळे बँकांना तोट्यातून काही प्रमाणात दिलासा मिळावा यासाठी असे करण्यात आले आहे. रिझव्र्ह बँकेने सांगितले की, बँका एटीएम ट्रान्झॅक्शनवरील शुल्क फ्री लिमिटनंतर २१ रुपये वाढवू शकतात.