मुंबई : कोरोनाचा आतापर्यंतचा घातक विषाणू असलेल्या ओमिक्राॅनच्या वृत्तानंतर कमॉडिटी बाजारात सोने वधारले होते. सोने आणि चांदीमध्ये सुरु असलेल्या तेजीला आज ब्रेक लागला आहे. आज गुरुवारी एमसीएक्सवर सोने १२० रुपयांनी तर चांदी १०० रुपयांनी स्वस्त झाली.
लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव ४७७५२ रुपये असून त्यात १२० रुपये घसरण झाली आहे. तत्पूर्वी आज सोन्याचा भाव ४७७०० रुपयांपर्यंत खाली घसरला होता. एक किलो चांदीचा भाव ६१२३७ रुपये असून त्यात ७० रुपये घसरण झाली आहे. तत्पूर्वी चांदीचा भाव ६११५६ रुपये इतका खाली घसरला होता.
सोनं विक्रमी उच्चांकाहून 8400 रुपये स्वस्त
2020 बद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीने 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज ऑगस्ट फ्युचर्स एमसीएक्सवर सोने 47,752 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही सुमारे 8400 रुपयांनी स्वस्त होत आहे.
सोन्याची शुद्धता कशी तपासायची?
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘BIS Care App’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.