जळगाव : जळगावात शहरात आज दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरीकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अरबी समुद्र आणि लक्षद्विप येथे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये तापी नदी काठच्या गावांना आणि नागरीकांना सुरक्षास्थळी राहण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात ३ डिसेंबर पर्यंत विविध ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. जळगाव जिल्ह्यात १ डिसेंबरला पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार आज दुपारी पावसाने हजेरी लावली.
दरम्यान, काल अवकाळी पावसाबाबत जिल्हाधीकारी यांनी सतर्कतेचा इशारा दिला होता. जळगाव जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व तापी नदीमधील पाण्याच्या पातळीत वाढ होवून हातनूर धरणाच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील शेतकरी व नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे. शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल, तर अशा शेतमालाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. अवकाळी पावसादरम्यान विजा, गारा व अतिवृष्टीपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. प्रसंगी मोकळे मैदान, झाडाखाली, वीजवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मर जवळ थांबू नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.