जळगाव प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील स्वप्निल रत्नाकर शिंपी (वय-२९) या कापूस व्यापारी तरूणाचा खून प्रकरणात एलसीबी व स्थानिक पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एक पोलीस कर्मचारी असल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक डॉक्टर प्रविण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मात्र, त्यांनी आरोपींची नावे सांगण्यास नकार दिला असून, या प्रकरणात आणखी काही आरोपी असू शकतात, असा संशय व्यक्त केला.
एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी हे जळगाव येथून हवाल्याचे सुमारे १५ लाख रुपये घेऊन जात होते. यावेळी त्यांची कार पाळधी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास तीन दुचाकीवर आलेल्या चौघांनी अडवीत १५ लाखांची रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला होता. व्यापाऱ्याने पैशांच्या बॅगेवरील स्वत:ची पकड सैल होऊ न दिल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या मांडीवर, पोटावर चाकूने वार केले.हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात स्वप्नील शिंपी यांचा मृत्यू झाला होता. जळगाव एलसीबीने अवघ्या दोन दिवसात गुन्ह्याचा उलगडा केला आहे.
दरम्यान, पाच आरोपींपैकी एक आरोपी पोलीस कर्मचारी असल्याची खळबळजनक माहितीपोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे या वेळी दिली. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री.चोपडे, सहाय्यक अधीक्षक कृषीकेश रावले, एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह टीमने तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.