जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथे सासू-सासऱ्याच्या जाचाला कंटाळून एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना तोवर जळगाव शहरात आणखी एका तरुणाने पत्नी व सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. पंकज उखर्डू खाचने (वय-२७) रा. आसोदा रोड, गोपाळपूरा, असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून दिड पानाची सुसाईड नोट आढळून आलीय. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर असे की, शहरातील जुना आसोदा रोड येथील गोपाळपूरा येथील पंकज उखर्डू खाचने हा आपल्या आई व पत्नी, मुलांसह वास्तव्याला आहे. पंकजची पत्नी ह्या दिवाळी निमित्त मुलासह दिवाळीला माहेरी गेल्या. त्यामुळे पंकज आणि त्याची आई कल्पना खाचने हे दोघे घरी होते.
रविवारी २८ नोव्हेंबर रोजी सकाळी पंकजची आई कल्पनाबाई बळीराम पेठेत भाजीपाला विक्री करण्यासाठी गेल्या. त्यावेळी पंकज हा घरी एकटाच होता. पंकजने राहत्या घरात घराचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेवून आत्महत्या केली. आई कल्पना ह्या दुपारी १२ वाजता घरी आल्या तेव्हा दरवाजा आतून बंद होता. शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता पंकजने गळफास घेतल्याचे दिसून आले. मुलाने गळफास घेतल्याचे पाहून आईने हंबरडा फोडला होता. आत्महत्या करण्यापुर्वी पंकज खाचने यान दिड पानाची सुसाईड नोट लिहिली होती. यात पत्नी, शालक, पोलीस असलेले सासरे व सासू यांच्या छळाला कंटाळून मी आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद आहे. सुसाईड नोट पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, सकाळीच शिरसोली येथे सासू-सासऱ्याच्या जाचाला कंटाळून एका युवकाने आत्महत्या केली. या घटनेला काही तास उलटत नाही तोवर जळगावात ही दुसरी घटना घडली.