नाशिक : नाशिकमधील सातपूरचे भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिक शहर हत्येच्या घटनेनं हादरलं असून अवघ्या चार दिवसात नाशिकमधील ही तिसरी हत्येची घटना आहे. दरम्यान,राजकीय पूर्ववैमनस्यातून हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
भाजप पदाधिकारी अमोल इघे यांचा मृतदेह सातपूरच्या कार्बन नाका परिसरात मृतदेह आढळून आला. आज, शुक्रवारी सकाळी सहा वाजता ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. गेल्या पाच दिवसांत नाशिकमध्ये तिसरी हत्या झाली आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.
नाशिकमधील युनियनच्या वादातून अमोल इघे यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासून पहाटे सहा वाजता नेमकं काय घडलं, याचा शोध पोलीस घेत आहेत.
रुग्णालय परिसरात समर्थकांची गर्दी
दरम्यान, नाशिक शासकीय रुग्णालयात तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात अधिकची कुमक बोलावून घेतली आहे. भाजप सातपूर मंडल अध्यक्ष अमोल इघे यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली आहे. नातेवाईक आणि कार्यकर्त्यांची जिल्हा रुग्णालयाच्या आवारात प्रचंड गर्दी झाली आहे.